Google search engine
HomeBreaking Newsदेवारपाडे येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला बंडूकाकांची आर्थिक मदत

देवारपाडे येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला बंडूकाकांची आर्थिक मदत

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

मालेगांव : गेल्या दोन वर्षांपासून असलेली नापिकी त्यात दुसरीकडे रोजंदारीने काम करून देखील कुटूंबाची उपजीविका कशी भागवावी या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने रात्र पाळी करतं चाळीसगांव फ़ाटयावरील किराणा दुकानात वॉचमनचे काम केले. शेतीच्या उताऱ्यावर भारत पेट्रोलियम कंपनीचा अधिग्रहण शिक्का असल्याने बँक व सोसायटीचे कर्ज मिळत नसल्याने नातेवाईक व सावकाराकडून हात उसनवार कर्ज घेतले. शिक्का असल्याने शेती देखील विकता येत नव्हती. या सगळ्यातून मार्ग काढत आपली उपजीविका भागवत असताना कसेबसे दिवस जात होते, अशात एक दिवस शेतात गेले. उभे पीक अतिवृष्टिने पाण्याखाली गेलेले चित्र बघितले. हातातोंडाशी आलेला घास गेला. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतून काहीच न बोलता ते घरी आले आणि आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

ही घटना मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील असून शिवाजी दशरथ सरोदे (५५) असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. दि.७ ऑक्टोंबर रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. शासकीय मदतीच्या अपेक्षेत असलेल्या या कुटुंबाच्या मदतीला धावून आले ते फक्त बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्छाव. त्यांनी काल मंगळवार दि.१९ रोजी तेराव्याच्या दिवशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेत रोख ३१ हजारांची मदत केली.

गट नंबर १९७/४ मध्ये जवळपास तीन एकर शेती असलेल्या या शेतात शिवाजी सरोदे यांनी कांदे, कपाशी, मका व बाजरी पिक घेतले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने सरोदे हताश झाले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शेतात जावून आलेल्या शिवाजी सरोदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नात असा परिवार आहे.

या घटनेची माहिती देवारपाडे येथील शेतकरी मित्र व ग्रामस्थांनी बंडू काकांना सांगितली. या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत हलाखीची असून शासकीय मदतीच्या अपेक्षेत असलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीची अपेक्षा या शेतकरी मित्र व ग्रामस्थांनी केली होती. काका देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या कुटुंबाच्या मदतीला धावून आले. यावेळी कमलाकर पवार ११ हजार, बंडू काका ११ हजार तसेच माणके येथील स्वप्निल देवरे, भायगाव येथील पिंटू अहिरे व आस्था फाउंडेशनचे जितू देसले यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये अशी एकूण ३१ हजार रुपयांची मदत बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने सरोदे कुटुंबियांना करण्यात आली. यावेळी कुटुंबियांनी काकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments